फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम २२० :
एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :
(१)त्याच संव्यवहाराचे घटक होऊ शकतील अशा प्रकारे एकमेकींशी निगडित असलेल्या कृतींच्या एका मालिकेत जर त्याच व्यक्तीने एकाहून अधिक अपराध केले असतील तर, तिच्यावर अशा प्रत्येक अपराधाचा दोषारोप ठेवून त्याबद्दल तिची एकाच संपरीक्षेत संपरीक्षा करता येईल.
(२)जेव्हा कलम २१२ च्या पोटकलम (२) मध्ये किंवा कलम २१९ च्या पोटकलम (१) मध्ये उपबंधित केल्याप्रमाणे फौजदारीपात्र न्यासभंग किंवा अप्रामाणिकपणे अपहार अशा एका किंवा अधिक अपराधांचा दोषारोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीवर, तो अपराध किंवा ते अपराध करणे सुकर होण्यासाठी किंवा ते केल्याचे लपवण्यासाठी तिने खोटे हिशेब दाखवण्याचा एक किंवा अधिक अपराध केले असल्याचा आरोप करण्यात आला असेल तेव्हा, अशा प्रत्येक अपराधाबद्दल तिच्यावर दोषारोप ठेवून त्याबद्दल तिची एका संपरीक्षेत संपरीक्षा करता येईल.
(३)अभिकथित कृती मिळून अपराध घडलेला असून, त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यातील ज्या व्याख्यांद्वारे अपराधाची व्याख्या केलेली किंवा शिक्षा ठरवलेली असेल अशा दोन किंवा अधिक अलगअलग व्याख्यांमध्ये तो मोडत असेल तर, अशांपैकी प्रत्येक अपराधाबद्दल त्यांचा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीवर दोषारोप ठेवून एका संपरीक्षेत तिची संपरीक्षा करता येईल.
(४) ज्या अनेक कृतींपैकी एखादी कृती हीच किंवा एकाहून अधिक कृती या स्वयमेव अपराध आहेत त्या एकत्र केल्या असता एक वेगळा अपराध होत असेल तर, अशा एकत्रित कृतींमुळे होणाऱ्या अपराधाबद्दल आणि अशांपैकी कोणत्याही एका किंवा अधिक कृतींनी घडणाऱ्या अपराधाबद्दल, त्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींवर दोषारोप ठेवून एका संपरीक्षेत तिचीा संपरीक्षा करता येईल.
(५)या कलमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम ७१ वर परिणाम करणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.