महाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३
कलम १२ :
व्यावृत्ती :
(१) शंकानिरसनार्थ, असे घोषित करण्यात येते की, या अधिनियमातील कोणतीही गोष्ट पुढील बाबींना लागू असणार नाही -
(एक) कोणत्याही धार्मिक वा आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा या प्रकारचे उपासनामार्ग तसेच वारकरी सांप्रदायाच्या व इतर वाऱ्या.
(दोन) हरिपाठ, कीर्तने, प्रवचने, भजने व इतर धार्मिक व पारंपारिक शास्त्रांचे तसेच प्राचीन विद्या व कलांचे शिक्षण, आचरण, प्रचार व प्रसार.
(तीन) दिवंगत संतांचे जमत्कार सांगणे, त्यांचा प्रसार, प्रचार व साहित्य वितरण करणे, तसेच शारीरिक व आर्थिक नुकसान न करणाऱ्या प्रकारचे धर्मगुरूंचे चमत्कार सांगणे, त्याचा प्रसार, प्रचार व साहित्य वितरण करणे.
(चार) घर, मंदिर, दर्गा, गुरूद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळ अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा व्यवस्थापनांद्वारे शारीरिक व आर्थिक नुकसान न करणारे अशा प्रकारचे केले जाणारे प्रार्थना, उपासना व सर्व धार्मिक विधी.
(पाच) सर्व धार्मिक उत्सव, सण, विधी, प्रार्थना, मिरवणूक व त्यासंबंधातील इतर धार्मिक कृत्ये, अंगात येणे, कडक लक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस बोलणे, मन्नत मागणे, मोहरम मिरवणूक इत्यादी सर्व धार्मिक विधी.
(सहा) धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे कान व नाक टोचणे, जैन धर्मीयांद्वारा करण्यात येणारे केशलोचन या सारखे धार्मिक विधी.
(सात) वास्तुशास्त्रानुसार तसेच जोशी-ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगण्याबद्दल सल्ला.
(आठ) राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करेल अशी वर नमूद केल्याव्यतिरिक्त कोणतीही परंपरागत धार्मिक विधी व कृत्ये.
(२) पोटकलम (१) च्या नोंद क्रमांक ८ नुसार शासनाने काढलेली कोणतीही अधिसूचना ती काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.