महाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३
कलम ६ :
प्रवेश करणे, झडती घेणे, इत्यादीचे अधिकार :
(१) राज्य शासनाने, याबाबत वेळोवेळी दिलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून, दक्षता अधिकाऱ्याला, त्याच्या अधिकारितेतील क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत, त्याच्या क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्याच्या साहाय्याने -
(एक) या अधिनियमाखालील अपराध केला आहे किंवा करण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, अशा कोणत्याही ठिकाणी, सर्व वाजवी वेळी, त्यास आवश्यक वाटेल अशा साहाय्यांसह, कोणतेही असल्यास, प्रवेश करता येईल व झडती घेता येईल.
(दोन) या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणतीही कृती किंवा गोष्ट करण्यासाठी जे वापरण्यात आले होते किंवा वापरण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, असे कोणतेही साहित्य, उपकरण किंवा जाहिरात जप्त करता येईल.
(तीन) खंड (एक) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही जागेत आढळलेल्या कोणत्याही अभिलेखाची, कागदपत्राची किंवा इतर महत्त्वाच्या वस्तूची तपासणी करता येईल आणि जर ती या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध केल्याचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल तर, ती जप्त करता येईल.
(२) संहितेच्या तरतुदी, संहितेच्या कलम ९४ अन्वये काढलेल्या अधिपत्राच्या प्राधिकाराखाली केलेल्या कोणत्याही झडतीस व जप्तीस जशा लागू होतील, तशाच त्या, या अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही झडतीस किंवा जप्तीस, शक्य होईल तेथवर, लागू होतील.
(३) जर एखाद्या व्यक्तीने, पोटकलम (१) च्या खंड (दोन) किंवा (तीन) अन्वये काहीही जप्त केले असल्यास, ती व्यक्ती, शक्य तितक्या लवकर, त्याबाबत दंडाधिकाऱ्यास कळवील व त्याच्या अभिरक्षेसाठी दंडाधिकाऱ्याचे आदेश घेईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.