महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४
कलम ५४ :
नियम :
(१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.
(२) विशेषकरून व वरील तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता, अशा नियमांत, पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी तरतूद करता येईल :-
(क) कलम ५ अन्वये अनुज्ञप्तीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना, त्यात समाविष्ट करावयाचा आणखी तपशील आणि अनुज्ञप्ती शुल्काची रक्कम व ती भरण्याची रीत;
(ख) कलम ६ अन्वये अनुज्ञप्तीचा नमुना व त्याच्या शर्ती;
(ग) कलम ७ अन्वये ठेवावयाच्या नोंदवहीचा नमुना;
(घ) सावकाराकडे तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेवरील दावे मागवण्यासाठी कलम १७ च्या पोटकलम (४) अन्वये नोटीस प्रसिद्ध करावयाची रीत;
(ङ) कलम २४ च्या पोटकलम (१) अन्वये ठेवावयाची रोकडवही व खातेवही यांचा नमुना व त्या वह्या ज्या रीतीने ठेवावयाच्या ती रीत, पोटकलम (२) अन्वये ज्या नमुन्यात पासबुक देण्यात येईल, त्या पासबुकाचा नमुना आणि पोटकलम (५) अन्वये विहित करावयाचा इतर तपशील;
(च) कलम २५ च्या पोटकलम (१) अन्वये पुरविण्यात आलेल्या लेखा विवरणपत्राचा नमुना व पोटकलम (३) अन्वये द्यावयाची खर्चाची रक्कम;
(छ) कलम २६ च्या पोटकलम (२) अन्वये द्यावयाचे शुल्क;
(ज) कलम ३६ ज्या पोटकलम (१) अन्वये करावयाच्या अर्जाचा नमुना व द्यावयाचे शुल्क;
(झ) या अधिनियमान्वये विहित केलेली किंवा विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही बाब अथवा या अधिनियमात ज्याबद्दल तरतूद केलेली नाही किंवा केलेली तरतूद अपुरी आहे आणि या अधिनियमान्वये तरतुदी अमलात आणण्याकरिता ज्याबाबत तरतूद करणे राज्य शासनाच्या मते आवश्यक आहे अशी इतर कोणतीही बाब;
(ञ) उपरोक्त नियमांपैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणे हा अपराध असेल व त्यास विहित केल्याप्रमाणे ज्या कमाल द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकेल अशा आशयाची तरतूद.
(३) या अधिनियमाखाली केलेला प्रत्येक नियम हा, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक अधिवेशनात मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीकरिता, प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरफार करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत झाले आणि अशा आशयाचा त्यांचा निर्णय त्यांनी राजपत्रात अधिसूचित केला तर तो नियम, अशा निर्णयाच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून केवळ अशा सुधारलेल्या स्वरूपात अमलात येईल किंवा यथास्थिती, तो अमलात येणार नाही; तथापि, असा कोणताही फेरफार केल्यामुळे किंवा तो नियम रद्द केल्यामुळे त्या नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टींच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.