गुंगीकारक मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७६
केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :
१) केंद्र सरकारला या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाच्या इतर तरतुदींना अधीन राहून शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून नियम करू शकेल.
२) यापूर्वीच्या अधिकारांच्या सर्वसाधारणपणास बाध न आणता असे नियम पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करू शकतील.
अ) कलम २ च्या खंड (पाच), (सहा) , (चौदा) व (पंधरा) च्या प्रयोजनांसाठी द्रवरूप तयार पदार्थामधील टक्केवारी मोजण्याची पद्धती;
ब) कलम ३४ अन्वये शांतता राखण्याबाबतच्या निष्पादित करावयाच्या बंधपत्राचा नमूना;
क) कलम ३९ च्या पोटकलम (१) नुसार व्यसनाधीन आरोपीला वैद्यकीय उपचारासाठी मुक्त करण्यासाठी निष्पादित करावयाच्या बंधपत्राचा आणि त्या कलमाच्या पोटकलम (२) नुसार रीतसर ताकीद दिल्यानंतर त्याला मुक्त करण्यापूर्वी अशा अपराधीने निष्पादित करावयाच्या बंधपत्राचा नमुना;
कअ) कलम ५० अ नुसार नियंत्रीत निष्पादनाच्या बांधीलकीची रित;
ड) भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून मिळालेले दस्तऐवज कलम ६६ खंड (दोन) नुसार प्राधिकृत करायचे ते कोणत्या प्राधिकरणाने किंवा व्यक्तीने आणि कोणत्या पद्धतीने करावयाचे;
डअ) कलम ६८-ग च्या पोटकलम (२) नुसार प्रशासकाने मालमत्तेची व्यवस्था ज्या रीतीने व ज्या शर्तीच्या अधीन राहून करावयाची ती रीत व त्या शर्ती;
डब) कलम ६८ न, पोटकलम (३) नुसार न्यायाधिकरणाचा सभापती आणि इतर सदस्य यांच्या सेवेच्या अटी व शर्ती;
डक) कलम ६८-ओच्या पोटकलम (६) नुसार अपील न्यायाधिकरणाचे अभिलेख व नोंदणी यांच्या तपासणीसाठी किंवा त्याच्या भागाच्या प्रमाणित प्रती प्राप्त करण्यासाठी द्यावयाची फी;
डड) कलम ६८ आरच्या खंड (फ) नुसार सक्षम प्राधिकरणाला आणि अपील न्यायाधिकरणाला वापरता येतील असे दिवाणी न्यायाधिकरणाचे अधिकार;
ड-इ) या नुसार जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तूंची व सर्व गोष्टींची विल्हेवाट लावणे;
ड-फ) नमुने काढून घेणे आणि अशा नमुन्यांची चाचणी व विश्लेषण करणे;
ड-ग) अधिकारी, खबऱ्या व इतर व्यक्ती यांना द्यावयाची बक्षिसे;
इ) कलम ७१, पोटकलम (१) नुसार केंद्र सरकारकडे किंवा अन्य व्यक्तींकडे नोंदणी करण्यात आलेल्या व्यसनी व्यक्तींना वैद्यकीय गरजांसाठी ज्या अटींवर व ज्या रीतीने गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ पुरविण्यात येतील त्या अटी व ती रीत;
फ) कलम ७१ च्या पोटकलम (१) नुसार केंद्र सरकारने स्थापन केलेल्या केंद्रांची आस्थापना, नेमणूक, देखभाल, व्यवस्थापन व पर्यवेक्षण आणि अशा केंद्रांमध्ये कामावर नेमलेल्या व्यक्तींचे अधिकार व कर्तव्ये;
ग) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांना उत्तेजन देणारे पदार्थ यांबाबत संयंत्रणा समितीच्या अध्यक्षाच्या आणि सदस्यांच्या पदांचा अवधी, प्रसंगावशात निर्माण होणाऱ्या रिकाम्या जागांवर नेमणूक करण्याची रीत आणि त्यांना द्यावयाचे वेतन व भत्ते आणि कलम ६, पोटकलम ५ खाली उप-समितीवर सदस्य नसलेल्या व्यक्तीची ज्या शर्तींवर व निर्बंधावर नेमणूक करता येईल त्या शर्ती व निर्बंध;
ह) आणि विहित करावयाच्या किंवा करता येतील अशा इतर बाबी.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.