ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००
नियम ५ :
ध्वनिक्षेपकाचा/जन संबोधन यंत्रणेचा आणि ध्वनि उत्पन्न करणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यावरील निर्बंध :
(१) प्राधिकाऱ्याकडून लेखी परवानगी घेतल्याखेरीज ध्वनिक्षेपकाचा किंवा सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर केला जाणार नाही.
(२) प्रेक्षागृह, सभागृह, समाजमंदिर, मेजवानी गृह (भोजन कक्ष) यांसारख्या संवादाच्या बंदिस्त जागांमध्ये किंवा सार्वजनिक आकस्मिक परिस्थितीत असेल त्याखेरीज रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा किंवा जनसंबोधन यंत्रणेचा किंवा ध्वनि उत्पन्न करणाऱ्या कोणत्याही उपकरणाचा किंवा संगीत वाद्यांचा किंवा ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येणार नाही.
(३) पोट-नियम (२) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासन, ध्वनि प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असतील अशा अटी व शर्तीस अधीन राहून, एका कॅलेंडर वर्षाच्या सर्व कालावधीमध्ये पंधरा दिवसांपेक्षा अधिक नसेल इतक्या मर्यादित कालावधीच्या कोणत्याही सांस्कृतिक किंवा धार्मिक सणाच्या प्रसंगी किंवा त्या कालावधीत रात्रीच्या वेळी (रात्रौ १०.०० ते १२.०० च्या दरम्यान) ध्वनिक्षेपकांचा किंवा सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणांचा किंवा तत्सम साधनांचा) वापर करण्यास परवानगी देऊ शकेल. संबंधीत राज्य शासन, ज्या दिवशी अशी सूट कार्यान्वित होईल त्या दिवसांची संख्या व तपशील आगाऊ स्वरूपात सर्वसाधारणपणे विनिर्दिष्ट करील.
(४) जेथे ध्वनिक्षेपकाचा किंवा सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणेचा किंवा अन्य कोणत्याही ध्वनि स्त्रोताचा वापर केला जातो, अशा सार्वजनिक ठिकाणाच्या सीमेतील ध्वनिची पातळी, क्षेत्राच्या सभोवतालच्या ध्वनि मानकापेक्षा १० डीबी (ए) पेक्षा अधिक असणार नाही किंवा ७५ डीबी (ए) इतकी किंवा त्यापेक्षा जी कमी असेल तितकी असेल.
(५) खाजगी मालकी असलेल्या ध्वनिक्षेपण यंत्रणेची किंवा ध्वनि निर्माण करणाऱ्या उपकरणाची परिघीय ध्वनि पातळी, खाजगी जागेच्या सीमेत, ज्या क्षेत्रात त्याचा वापर केला जात आहे त्या क्षेत्रासाठी विनिर्दिष्ट केलेल्या सभोवतालच्या ध्वनि मानकांच्या ५ डीबी (ए) पेक्षा अधिक असणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.