कलम २३ : नियम करण्याचा अधिकार :
अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६
कलम २३ :
नियम करण्याचा अधिकार :
(१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करू शकेल.
(२) विशेषत: आणि पूर्ववर्ती अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न येता, अशा नियमांत, -
(क) कोणत्याही जागा सार्वजनिक जागा म्हणून अधिसूचित करणे;
(ख) कलम १७ च्या पोटकलम (१) अन्वये ज्यांच्या सुरक्षित अभिरक्षेबाबत आदेश देण्यात आले असतील अशा व्यक्तींना अभिरक्षेत ठेवणे आणि त्यांचे परिक्षण करणे;
(खख) कलम १०-क च्या पोटकलम (३) अन्वये अपराध्याची सुधारसंस्थेतून मुक्तता करणे आणि अशा अपराध्याला द्यावयाचा लायसनचा नमुना;
(ग) या अधिनियमान्वये, व्यक्तींना सुरक्षागृहात किंवा यथास्थिती, सुधारसंस्थेत स्थानबद्ध करणे किंवा ठेवणे आणि त्यांचे परिरक्षण करणे;
(घ) सुटका झालेल्या सिद्धापराध्यांच्या निवासस्थानाच्या किंवा निवासस्थान बदलण्याच्या किंवा तेथे गैरहजर असण्याच्या अधिसूचनेबाबत कलम ११ च्या तरतुदी अमलात आणणे;
(ङ) कलम १३ च्या पोटकलम (१) अन्वये विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी प्राधिकार प्रदान करणे;
(च) कलम १८ च्या तरतुदी अमलात आणणे;
(छ) (एक) कलम २१ अन्वये सुरक्षागृहांची किंवा सुधारसंस्थांची स्थापना, परिरक्षण व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण आणि अशा सुरक्षागृहांमध्ये किंवा संस्थेमध्ये कामावर असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती, त्यांचे अधिकार व कर्तव्ये;
(दोन) लायसन मिळविण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना आणि अशा अर्जात अंतर्भूत करावयाचा तपशील;
(तीन) लायसन देण्याची किंवा तिचे नवीकरण करण्याची कार्यपद्धती, असे लायसन ज्या वेळेस देण्यात किंवा नवीकरण करण्यात येईल ती वेळ आणि लायसनच्या अर्जासंबंधी सर्व आणि संपूर्ण तपासणी करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती;
(चार) लायसनचा नमुना आणि त्यात विनिर्दिष्ट करावयाच्या शर्ती;
(पाच) ज्या रीतीने सुरक्षागृहाचे आणि सुधारसंस्थांचे लेखे ठेवण्यात येतील व त्यांची लेखापरीक्षा केली जाईल ती रीत;
(सहा) लायसनधारकाने नोंदवह्या व विवरणपत्र ठेवणे आणि अशा नोंदवह्यांचा आणि विवरणपत्रांचा नमुना;
(सात) सुधारगृहांतील आणि सुधारसंस्थांमधील सहवाशांची काळजी, उपचार, परिरक्षा प्रशिक्षण, निदेशन, नियंत्रण आणि शिस्त;
(आठ) अशा सहवाशांना भेटी देणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे;
(नऊ) स्थानबद्धतेची शिक्षा झालेल्या व्यक्तींना सुरक्षागृहात किंवा सुधारसंस्थेत पाठविण्याची व्यवस्था होईपर्यंत अशा सुरक्षागृहात किंवा सुधारसंस्थेत तात्पुरते स्थानबद्ध करणे;
(दहा) सहावाशाचे, -
(क) एकाकडून दुसऱ्या सुरक्षागृहाकडे किंवा सुधारसंस्थेकडे;
(ख) कलम २१ च्या, पोटकलम (९-क) अन्वये एकाकडून दुसऱ्या सुधारसंस्थेकडे किंवा सुरक्षालयाकडे स्थानांतरण करणे;
(अकरा) जी व्यक्ती कोडगी असल्याचे किंवा सुरक्षागृहातील किंवा सुधारसंस्थेतील इतर सहवाशांवर तिचा वाईट प्रभाव पडत असल्याचे आढळून येईल, तिला न्यायालयाच्या आदेशानुसार सुरक्षागृहात किंवा सुधारसंस्थेतून कारागृहात स्थानांतरित करणे आणि अशा कारागृहातील तिच्या स्थानबद्धतेचा कालावधी;
(बारा) कलम ७ किंवा कलम ८ अन्वये शिक्षा झालेल्या व्यक्तींना सुरक्षागृहात किंवा सुधारसंस्थेत स्थानांतरित करणे आणि त्याच्या अशा सुरक्षागृहातील किंवा संस्थेतील स्थानबद्धतेचा कालावधी;
(तेरा) सुरक्षागृहात किंवा सुधारसंस्थेतून एकतर पूर्णपणे किंवा शर्तींच्या अधीनतेने सहवाशांची सुटका करणे आणि अशा शर्तींचा भंग केल्याच्या प्रसंगी त्यांना अटक करणे;
(चौदा) अल्प कालावधीकरिता सहवाशाला, तो स्वत: अनुपस्थित राहण्याची परवानगी देणे;
(पंधरा) ज्यात व्यक्तींना ठेवले जाईल, स्थानबद्ध केले जाईल आणि त्यांची देखभाल केली जाईल अशा सुरक्षागृहांची आणि सुधारसंस्थांची आणि इतर संस्थांची तपासणी करणे;
(ज) विहित करावी लागेल, किंवा विहित करता येईल अशी कोणतीही अन्य बाब, यांसाठी तरतूद करता येईल.
(३) पोटकलम (२) च्या खंड (घ) किंवा (छ) अन्वये कोणताही नियम करताना राज्य शासन अशी तरतूद करू शकेल की, त्या नियमांचा भंग केल्यास दोनशे पन्नास रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकेल.
(४) या अधिनियमाखाली केलेले सर्व नियम, ते करण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर विधानमंडळासमोर ठेवले जातील.
The Immoral Traffic ( Prevention ) Act 1956 in Marathi section 23.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
No feedback yet
Form is loading...