अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,-
(क) कुंटणखाना यात जे लैंगिक शोषण किंवा लैंगिक दुराचार करण्यासाठी अन्य व्यक्तीच्या लाभासाठी किंवा दोन किंवा अधिक वेश्यांच्या परस्पर लाभासाठी वापरले असेल असे कोणतेही घर, खोली, वाहन किंवा जागा किंवा यांचा कोणताही भाग, यांचा समावेश असेल .
(कक) बालक याचा अर्थ ज्याने वयाची १६ वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशी व्यक्ती, असा आहे.
(ख) सुधार संस्था याचा अर्थ, ज्यात, ज्यांना सुधारण्याची गरज आहे,अशा व्यक्तींना या अधिनियमान्वये स्थानबद्ध करता येईल, अशी (कलम २१ अन्वये सुधार संस्था म्हणून स्थापन झालेली किंवा तसे लायसन मिळालेली संस्था) कोणत्याही नावाने संबोधली जाणारी संस्था, असा असून त्यामध्ये, या अधिनियमानुसार न्यायचौकशी चालू असलेल्या व्यक्तींना जिथे ठेवता येऊ शकेल अशा आश्रयस्थानांचा अंतर्भाव आहे;
(ग) दंडाधिकारी याचा अर्थ, अनुसूचीच्या दुसऱ्या स्तंभामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व ज्या कलमात हा शब्दप्रयोग येईल त्या कलमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यास सक्षम असलेला दंडाधिकारी, असा आहे ते कलम, अनुसूचीच्या पहिल्या स्तंभामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आले आहे.
(गक) सज्ञान याचा अर्थ, ज्या व्यक्तीने वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली असतील अशी व्यक्ती, असा आहे.
(गख) अज्ञान याचा अर्थ, जिने वयाची सोळा वर्षे पूर्ण केली आहेत; परंतु वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशी व्यक्ती, असा आहे.
(घ) विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले, असा आहे.
(च) वेश्याव्यवसाय याचा अर्थ, वाणिज्यिक प्रयोजनांकरिता केलेले, व्यक्तींचे लैंगिक शोषण किंवा केलेला लैंगिक दुराचार आणि वेश्या या शब्दप्रयोगाचा अन्वयार्थ तदनुसार लावण्यात येईल.
(छ) सुरक्षागृह याचा अर्थ, ज्यांची काळजी घेण्याची व ज्यांना संरक्षण देण्याची गरज आहे अशा व्यक्तींना या अधिनियमान्वये जेथे ठेवण्यात येते आणि जेथे समुचित तांत्रिक अर्हता असलेल्या व्यक्ती, साधनसामग्री व इतर सुविधांची तरतूद करण्यात आलेली असते अशी (कलम २१ अन्वये सुरक्षागृह म्हणून स्थापना झालेली किंवा अनुज्ञप्ती मिळालेली संस्था) कोणत्याही नावाने संबोधली जाणारी संस्था, असा आहे परंतु ज्यात,-
(एक) संरक्षण, जेथे या अधिनियमाला अनुसरून, ज्यांची न्यायचौकशी चालू आहे अशा व्यक्तींना ठेवता येईल, किंवा
(दोन) सुधार संस्था,
याचा समावेश होत नाही.
(ज) सार्वजनिक ठिकाण याचा अर्थ, कोणतीही सार्वजनिक वापरासाठी किंवा आम जनतेला प्रवेश असणारी जागा, असा आहे आणि यात कोणत्याही सार्वजनिक वाहनांचा समावेश होतो.
(झ) विशेष पोलीस अधिकारी याचा अर्थ, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, विनिर्दिष्ट क्षेत्रातील पोलीस कर्तव्यांचा प्रभारी म्हणून राज्य शासनाने किंवा राज्य शासनाच्या वतीने नियुक्त केलेला पोलीस अधिकारी, असा आहे.
(ञ) अपव्यापार पोलीस अधिकारी याचा अर्थ, कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये केंद्र सरकारने नियुक्त केलेला पोलीस अधिकारी, असा आहे.
The Immoral Traffic ( Prevention ) Act 1956 in Marathi section 2.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.