१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ५९
अनुज्ञप्तीधारण करणाऱ्या व्यक्तीस किंवा मालकास साठ्याची विल्हेवाट लावण्याविषयी फर्माविण्याचा आयुक्ताचा अधिकार :
१) कोणतेही अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र ज्या मुदतीपर्यंत अमलात असेल ती मुदत संपली नाही तरीही आयुक्तास ते धारण करणाऱ्या व्यक्तीला आदेश देऊन, अशा आदेशात निर्दिष्ट करण्यात येईल अशा तारखेपूर्वी मादक द्रव्य विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ किंवा भांग किंवा मोहाची फुले यांचा त्याच्यापाशी जो साठा असेल त्याची विल्हेवाट लावण्याविषयी निर्देश देण्याचा अधिकार आहे.
१अ) तसेच आयुक्तास कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग किंवा मोहाची फुले यांच्या साठ्याचा जो मालक असेल व जो त्यासाठी कोणतेही अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करीत नसेल त्याला आदेशात निर्दिष्ट करण्यात येईल अशा तारखेपूर्वी अशा साठ्याची विल्हेवाट लावण्याविषयी निदेश देऱ्याचा अधिकार आहे आणि मालकाने अशा निदेशाने पालन केले पाहिजे.
२) अशा रीतीने निर्दिष्ट केलेल्या तारखेनंतर मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग किंवा मोहाची फुले यांची विल्हेवाट न लावता शिल्लक राहिलेला कोणताही साठा, तो ज्यात असेल त्या पात्रांसह किंवा संवेष्टनासह, आयुक्तांच्या आदेशावरून राज्यशासनाकडे जमा करता येईल. कोणतेही अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द केल्यानंतर किंवा त्याची मुदत संपल्यानंतर आयुक्तास असाही निदेश देता येईल की, अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणाऱ्या व्यक्तीपाशी कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ, भांग किंवा मोहाची फुले यांचा शिल्लक राहिलेला कोणताही साठा, तो ज्यात असेल त्या पात्रांसह किंवा संवेष्टनांसह राज्य शासनाकडे जमा करण्यात यावा.
३) पोट-कलम (२) अन्वये सरकारजमा केलेल्या वस्तू विकण्यात आल्या तर, आयुक्तास योग्य वाटल्यास, अशा वस्तू विकून आलेली संबंध रक्कम किंवा तिचा कोणताही भाग त्यांच्या मालकास देण्यात यावा असा आदेश देता येईल.
४) पोट-कलमे (१), (१-अ), (२) किंवा (३) अन्वयेचा कोणताही निदेश किंवा आदेश हा अशा निदेशामुळे किंवा आदेशामुळे ज्या व्यक्तींवर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल अशा व्यक्तीस आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली असल्याशिवाय आणि आयुक्ताने दिलेल्या निदेशाबद्दलच्या किंवा केलेल्या आदेशाबद्दलच्या कारणांची लेखी नोंद केलेली असल्याशिवाय देता कामा नये.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.