अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ७ :
शिक्षा :
१.(१) जर कोणत्याही व्यक्तीने कलम ३ खाली काढण्यात आलेल्या आदेशंचे व्यतिक्रमण केले तर, -
क) ती व्यक्ती -
एक) त्या कलमाच्या पोटकलम (२) च्या खंड (ज) किंवा (झ) ला अनुलक्षून दिलेल्या आदेशाच्या बाबतीत, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडासही पात्र होईल; आणि
दोन) अन्य कोणत्याही आदेशाच्या बाबतीत, तीन महिन्यांहून कमी नसेल परंतु, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडासही पात्र होईल :
परंतु, न्यायालय, निकालात नमूद केलेल्या कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणांसाठी, तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा देऊ शकेल;
ख) जिच्याबाबत आदेशाचे व्यतिक्रमण झाले असेल अशी कोणतीही मालमत्ता जप्त होऊन शासनाकडे जमा होईल;
ग) ज्यामध्ये मालमत्ता आढळली ते आवष्टन, आच्छादन किंवा पात्र आणि मालमत्तेच्या ने-आणीसाठी वापरण्यात आलेले कोणतेही जनावर, वाहन, जलयान किंवा अन्य यान हे न्यायालयाने तसा आदेश दिल्यास, जप्त होऊन शासनाकडे जमा होईल.
२) कलम ३ च्या पोटकलम (४) मधील खंड (ख) खाली ज्या कोणत्याही व्यक्तीला निदेश दिलेला असेल ती व्यक्ती त्या निदेशाचे अनुपालन करण्यास चुकली तर, तीन महिन्यापेक्षा कमी नसेल व सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडासही ती पात्र होईल :
परंतु, न्यायालय, निकालात नमूद केलेल्या कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणांसाठी, तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा देऊ शकेल;
२-क) पोटकलम (१) खंड (क) चा उपखंड (दोन) याअन्वये किंवा पोटकलम (२) अन्वये एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष ठरलेली कोणतीही व्यक्ती त्याच उपबंधाखालील अपराधाबद्दल पुन्हा सिद्धदोष ठरली असेल तर, ती व्यक्ती दुसऱ्या व त्यानंतरच्या प्रत्येक अपराधाबद्दल सहा महिन्यांहून कमी नसेल परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडासही पात्र होईल :
परंतु, न्यायालय, निकालात नमूद केलेल्या कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणांसाठी, तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा देऊ शकेल.
३.(३) एखादी व्यक्ती पोटकलम (१) खालील अपराधाबद्दल सिद्धदोष ठरलेली असून जर अत्यावश्यक वस्तूबाबत आदेशाचे व्यतिक्रमण केल्याबद्दल त्याच पोटकलमाखाली ती पुन्हा सिद्धदोष ठरली असेल तर, ज्या न्यायालयाने तिला सिद्धदोष ठरवले ते न्यायालय त्यां पोटकलमाखाली देण्यात येईल अशा कोण्यत्याही दंडाव्यतिरिक्त, आदेशाद्वारे, त्या व्यक्तीने आदेशात न्यायालयाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे किमान सहा महिने इतक्या कालावधीत त्या अत्यावश्यक वस्तूच्या संबंधात कोणताही व्यापारधंदा चालवू नये असे निदेशित करील.)
----------
१. १९७४ चा अधिनियम ३०, कलम ६ द्वारे पोटकलमे (१) व (२) या ऐवजी ही पोटकलमे दाखल करण्यात आली (२२ जून, १९७४ रोजी व तेव्हापासून).
२. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ७ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection7 #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम७
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.