महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २५८ :
आदेशाचे पुनर्विलोकन :
१)राज्य शासन आणि प्रत्येक महसूल किंवा भू-मापन अधिकारी आपण होऊन किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही पक्षकाराच्या अर्जावरून आपण दिलेल्या किंवा आपल्या कोणत्याही पुर्वाधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे पुनर्विलोकन करील आणि त्यासंबंधात त्यास योग्य वाटेल असा आदेश देईल.
परंतु,-
(एक) आपण स्वत: न दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाचे लेखन प्रमादाच्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणावरून पुनर्विलोकन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकाऱ्यास किंवा जमाबंदी अधिकाऱ्यास वाटेल तर तो प्रथम आयुक्ताची किंवा, यथास्थिति, जमाबंदी आयुक्ताची मंजुरी घेईल. आणि जर जिल्हाधिकाऱ्यास किंवा जमाबंदी अधिकाऱ्यास दुय्यम असलेल्या अधिकाऱ्याने, लेखन प्रमादाच्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणावरून कोणत्याही आदेशाचे -मग असा आदेश त्याने स्वत: दिलेला असो किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्याने दिलेला असो-पूनर्विलोकन करण्याचे ठरविले असेल तर, तो प्रथम ज्यास दुय्यम असेल अशा अधिकाऱ्याची मंजुरी घेईल.
(दोन) कोणत्याही आदेशात संबंधित फक्षकारास उपस्थित राहण्याबद्दल आणि त्या आदेशाच्या समर्थनार्थ आपले म्हणणे मांडण्याबद्दल नोटीस देण्यात आल्याशिवाय अशा कोणत्याही आदेशात बदल करण्यात येणार नाही किंवा तो फिरविण्यात येणार नाही ;
(तीन)ज्यावर अपील करण्यात आले असेल किंवा जो पुनरीक्षणाच्या कार्यवाहीचा विषय असेल अशा कोणत्याही आदेशाचे पुनर्विलोकन असे अपील किंवा कार्यवाही अनिर्णीत असेपर्यंत करण्यात येणार नाही ;
(चार) खाजगी व्यक्तींच्या परस्परांमधील हक्काच्या कोणत्याही प्रश्नावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही आदेशाचे पुनर्विलोकन, सदरहू कार्यवाहीतील, कोणत्याही पक्षकाराने अर्ज केल्याशिवाय करण्यात येणार नाही व अशा आदेशाचे पुनर्विलोकन करण्याबद्दलचा कोणताही अर्ज उक्त आदेश देण्यात आल्यापासून नव्वद दिवसांच्या आत करण्यात आला नसेल तर दाखल करून घेण्यात येणार नाही.
२)पुढील कारणांखेरीज इतर कोणत्याही कारणावरून कोणत्याही आदेशाचे पुनर्विलोकन करण्यात येणार नाही; ती कारणे अशी ;-
(एक) नवीन आणि महत्त्वाच्या बाबींचा किंवा पुराव्याचा शोध ;
(दोन)अभिलेख पाहताक्षणीच दिसून येणारी एखादी चूक किंवा दोष; किंवा
(तीन)इतर कोणतेही पुरेसे कारण.
३)या कलमाच्या प्रयोजनांकरिता जिल्हाधिकारी हा, जो महसूल किंवा भू-मापन अधिकारी जिल्हा सोडून गेला असेल किंवा ज्याचे महसूल किंवा भू-मापन अधिकारी या नात्याने अधिकार वापरणे बंद झाले असून त्या जिल्हयात ज्यांच्या जागेवर त्याच्यानंतर काम करणारा कोणी अधिकारी नसेल त्या महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याचा उत्तराधिकारी असल्याचे मानण्यात येईल.
४)अपिलात किंवा पुनरीक्षणात ज्यावर निर्णय झाला असेल त्या आदेशाचे पुनर्विलोकन, अपील किंवा पुनरीक्षण प्राधिकाऱ्याला दुय्यम असलेला कोणताही महसूल किंवा भू-मापन अधिकारी करणार नाही.
५)पुनर्विलोकन करताना दिलेल्या आदेशाचे कोणत्याही कारणावरून पुनर्विलोकन करण्यात येणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२५८
#MLRCAct1966Marathisection258 #section258MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.