महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३१ :
दुमाला गावास विवक्षित तरतुदी लागू असणे :
१)कलम ६८ व प्रकरणे पाच,सहा, सात, आठ व नऊ यांच्या तरतुदी पुढील फेरफारांना अधीन राहून, दुमाला गावास आणि गावांच्या दुमाला हिश्शास लागू असतील ;-
(एक) राज्य शासनाने अशा कोणत्याही गावाच्या किंवा हिश्श्याच्या धारकाशी किंवा धारकांशी केलेल्या कोणत्याही प्रसंविदेच्या किंवा कराराच्या तरतुदींना अधीन राहून, कलम ७९ अन्वये निदेश देण्यात आलेल्या कोणत्याही भू-मापनाचा किंवा कलम ८३ अन्वये निदेश दिलेल्या नवीन भू-मापनाचा आणि अशा कोणत्याही गावात किंवा हिश्श्यात उक्त प्रकरणान्वये करण्यात आलेल्या कोणत्याही जमाबंदीचा खर्च, गावाच्या किंवा हिश्श्याच्या खंडातील किंवा महसुलातील आपल्या हिश्श्याच्या प्रमाणात, धारकाने किंवा धारकांनी देण्यायोग्य असेल ;
(दोन) राज्य शासनाने तसा निदेश दिला असेल तर असा खर्च, राज्य शासनाच्या मते ज्यांचा अशा गावातील कोणत्याही जमिनीत किंवा हिश्श्यात कोणताही हितसंबंध असेल अशा व्यक्तींच्या कोणत्याही वर्गाकडूनसुध्दा राज्य शासन निदेश देईल अशा प्रमाणात देण्यात येईल ;
(तीन) अशा कोणत्याही गावात किंवा हिश्श्यात, प्रकरण पाच किंवा सहा अन्वयेची जमाबंदी सुरू केल्यानंतर अशा गावाचे किंवा हिश्श्याचे एक वा अनेक धारक त्या गावाच्या किंवा हिश्श्याच्या खंडातील किंवा महसुलातील त्याच्या/ त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात, पुढील रकमा देण्यास पात्र ठरतील ;-
क)गावासाठी किंवा हिश्श्यासाठी नेमण्यात आलेल्या ग्राम अधिकाऱ्यांची वेतने, यामध्ये गावातील अंशराशीकृत कुलकर्णी वतनाच्या संबंधात काही अंशराशीकृत भत्ते द्यावयाचे असल्यास त्या भत्त्यांचा समावेश होईल;
ख)१९६२ चा ५. -महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलमे १४४, १५१ आणि १५२ या अन्वये उपकर बसविण्याचा खर्च;
(चार) खंड (एक) आणि (तीन) अन्वयेचे दायित्व, अशा गावाच्या किंवा हिश्श्याच्या खंडावरील किंवा महसुलावरील पहिला भार असेल ;
(पाच) अशा कोणत्याही भागात किंवा हिश्श्यात धारण केलेल्या जमिनीच्या संबंधात खंड (एक) आणि (तीन) अन्वये द्यावयाची एकूण रक्कम, अधिकाराभिलेखामध्ये नमूद केलेल्या अशा गावाच्या किंवा हिश्श्याच्या धारकाकडून वसूल करण्यात येईल ;
(सहा) व्यक्तींच्या कोणत्याही वर्गाकडून खंड (दोन) अन्वये देय असलेली रक्कम राज्य शासन निदेश देईल अशा रितीने, अधिकाराभिलेखात, नमूद केल्याप्रमाणे त्या वर्गाच्या सदस्यांकडून वसूल करण्यात येईल.
२)दुमाला गावात यापूर्वी सुरू केलेल्या सर्व भू-मापन जमाबंदी, या कलमाच्या तरतुदींनुसार त्या सुरू करण्यात आल्या असल्याप्रमाणे कायदेशीर असतील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३३१
#MLRCAct1966Marathisection331 #section331MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.